
उमरेड पोलिसांची मोठी कारवाई : ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेल्या अमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का
उमरेड : अमली पदार्थांचे (एमडी-मेफेड्रोन) लोण आता ग्रामीण भागातही पोहोचले असून, उमरेड पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठी कारवाई करत या रॅकेटला जोरदार धक्का दिला आहे. उमरेड शहरातील बायपास चौकात नाकाबंदी करून पोलिसांनी एमडी पावडर बाळगणाऱ्या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ हजार रुपये किमतीची २.७२ ग्रॅम एमडी पावडरसह एकूण ५ लाख ८,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूरच्या रेशीमबाग परिसरातून एमडी पावडर खरेदी करून उमरेडकडे एक स्कॉर्पिओ येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बायपास चौकात नाकाबंदी केली. या नाकाबंदीत (एमएच-३०/एएफ ४१७९) क्रमांकाची स्कॉर्पिओ अडवून पोलिसांनी त्यातील चार आरोपींची चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तेव्हा तीन आरोपींकडे प्रत्येकी दोन असे एकूण सहा एमडी पावडरचे पाऊच आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रज्वल लीलाधर माथने (२१, रा. मेंढा, ता. भिवापूर), योगेश फुलचंद पवार (२८, रा. नाड, शिवनफळ, ता. भिवापूर), अद्वेत वसंता हेडावू (३२, रा. शिवनगर, उमरेड) आणि कारचालक निखिल अरुण कुहीकर (३१, रा. परसोडी, यांचा समावेश आहे. उमरेड न्यायालयाने या चारही आरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील काही महिन्यांपासून उमरेड शहरात एमडी पावडरचा वापर वाढला होता. ‘नागपूर ते उमरेड’ आणि ‘उमरेड ते ग्रामीण’ भागापर्यंत हे रॅकेट सक्रिय झाले होते. हे लक्षात घेऊन पोलिसांनी दीड महिन्यांपासून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. अनेकदा प्रयत्न फसले, पण पोलिसांनी हार मानली नाही आणि मंगळवारी आखलेल्या योजनेमुळे त्यांना यश आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, पोलिस निरीक्षक धनाजी जळक, उपनिरीक्षक किरण महागावे, माणिक गुट्टे, हवालदार राधेश्याम कांबळे, पंकज बट्टे, गोवर्धन सहारे, चेतन माहुलकर, रमेश खरकाटे, सचिन हटवार यांनी केली.



