क्राईमगडचिरोलीविदर्भ

पोलिसांची दारू अड्ड्यांवर धाड ; ४.३९ लाखांचा मुद्देमाल नष्ट

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली नजीक असलेल्या नदी पात्रात अवैध दारू गाळणाऱ्या अड्ड्यांवर पोलिस व मुक्तिपथ टीमने संयुक्तरीत्या धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलापल्ली हे तालुक्यातील मुख्य गाव आहे. या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिस, मुक्तिपथ व गाव संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू आहात. आतापर्यंत गावातील दारूविक्रत्यांविरोधात कारवाई करून चांगलाच धडा शिकविण्यात आला आहे. तरी सुद्धा काही विक्रेते जंगल परिसर व नदीपरिसराचा आधार घेत दारू गाळतात. अशातच नदी पात्रामध्ये काही लोक अवैध दारू गाळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुक्तीपथ टीम व पोलिसांनी सापळा रचून अहिंसक कृती केली. यावेळी दोन इसम दारू काढताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

या छाप्यात पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. यात ६८ ड्रम गुळाचा सळवा, दोन पेटी गूळ आणि ८ किलो साखर यासह इतर असा एकूण ४ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश वळवी यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार येवले व विनोद आत्राम यांनी केली. या मोहिमेत मुक्तीपथचे  नंदिनी आशा, महेश खोब्रागडे, धिरज शामकुवार आणि स्पार्क कार्यकर्ते तुळशीराम आईलवार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी उचललेल्या या कडक पावलामुळे परिसरात दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button