
‘आत्मा’च्या पुढाकाराने ८०० शेतकरी नैसर्गिक शेतीकडे ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी प्रकल्पाला दिली भेट
गडचिरोली : जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ अंतर्गत ‘रोपवन शेतकरी उत्पादक कंपनी’ नैसर्गिक शेतीचे एक अभिनव मॉडेल यशस्वीपणे साकारत आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. ‘आत्मा’ मार्फत राबवण्यात येत असलेल्या या अभियानामुळे जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला बळ मिळत आहे.
सध्या ‘रोपवन शेतकरी उत्पादक कंपनी’ ५० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत एकूण २० गट स्थापन करून कार्य करत आहे. यात तब्बल ८०० शेतकरी सदस्य जोडले गेले असून, ते नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करत आहेत. या कंपनीने पहिल्याच प्रयत्नात बायोडायनॅमिक कंपोस्ट खत आणि दहा ड्रम अर्क निर्मिती पद्धतीने तरल खत तयार केले आहे. या खतांचे वितरण त्यांच्या सदस्यांना सुरू झाले असून, नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
श्रीमती प्रीती हिरळकर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BIRC) आणि शेत बांधावरच्या प्रयोगशाळेची निर्मिती वेगाने सुरू आहे. या केंद्रांमुळे स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक असलेल्या जैविक निविष्ठा सहज उपलब्ध होतील, तसेच शेतकरी आपल्या शेतातील माती व पाण्याची तपासणी स्वतः करू शकतील. भेटीदरम्यान श्रीमती हिरळकर यांनी घाटी येथील प्रकल्पाची सखोल पाहणी केली. कंपनीचे शेतकरी अत्यंत प्रयोगशील आणि होतकरू असून, त्यांनी १५ एकर क्षेत्रावर सलग हळद लागवड केली आहे, तर ५० एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड आदी बाबी राबविल्या जात आहेत.
शेतकऱ्यांच्या या गुणांची दखल घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी, जिल्हा खनिज निधीमार्फत जैविक निविष्ठा किट, मोहफुल संकलन केंद्र आणि मधुमक्षिका पालन बाबत आजीविका क्लस्टर मधून लाभ दिलेला आहे. ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ अंतर्गत चांगले काम करत असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा मानस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी व्यक्त केला.
‘रोपवन शेतकरी उत्पादक कंपनी’चे सदस्य रमेश पिलारे यांनी सांगितले की, “आमच्या कंपनीला केवळ आठ ते दहा महिने झाले आहेत, तरीही कृषी विभाग व ‘आत्मा’च्या सहकार्यामुळे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. सेंद्रिय निविष्ठा, मोहफुल संकलन केंद्र, आणि मधुमक्षिका पालनामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या काळात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनात आमची कंपनी नक्कीच चांगली वाटचाल करेल अशी आम्हाला आशा आहे.”
या भेटीप्रसंगी जिल्ह्याचे तंत्र अधिकारी आनंद कांबळे, उपकृषी अधिकारी महेश परांजपे (वडसा), संजय रामटेके (कुरखेडा), योगेश बोरकर (कुरखेडा), सहायक कृषी अधिकारी सोनी वडे, सपना कन्नाके, प्रियांका दडमल, आशीष बन्सोड (एटीएम) आणि कंपनीचे संचालक रमेश पिलारे, रेवनाथ नाकाडे, लोकेश बावणे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.



