महाराष्ट्रमुंबई

रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, क्विंटलमागे १७० रुपये मिळणार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; सरकारवर ९२ कोटींचा अतिरिक्त भार

मुंबई : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत काम करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमुळे आता दुकानदारांना प्रति क्विंटल १५० रुपयांऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.

राज्यातील सुमारे ५३,९१० रास्त भाव दुकानदार ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना धान्य, साखर आणि इतर वस्तूंचे वितरण करतात. या दुकानदारांना आतापर्यंत केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य सरकारकडून १०५ रुपये असे मिळून एकूण १५० रुपये मार्जिन मिळत होते.

या दुकानदारांच्या संघटनांनी मार्जिन वाढवण्याची मागणी सातत्याने केली होती. ही मागणी लक्षात घेऊन सरकारने त्यांच्या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button