
एकाला अटक तर मुख्य सूत्रधार फरार; २५ बॉक्समधील २५०० देशी दारूच्या बाटल्या जप्त
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरोधात सुरू ठेवलेल्या धडक मोहिमेत देसाईगंज पोलिसांच्या पथकाने २१ जून रोजी वैनगंगा नदीकाठाजवळ सापळा रचून एक मोठी कारवाई केली आहे. ब्रह्मपुरीकडून देसाईगंजच्या दिशेने कारमधून होणारी अवैध देशी दारूची वाहतूक पकडण्यात पोलिसांना यश आले असून, घटनास्थळावरून दारूचा साठा आणि कारसह एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार फरार आहे.
सविस्तर वृत्त असे की, २१ जून रोजी देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक इसम ब्रह्मपुरीकडून देसाईगंजच्या दिशेने सिल्व्हर रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ कारने (क्र. एम.एच. २० बी.सी. ८१६१) मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू घेऊन येत आहे. या माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांनी तातडीने हालचाली करत ब्रह्मपुरी ते देसाईगंज मार्गावरील वैनगंगा नदीकाठाजवळ नाकेबंदी करून सापळा रचला.
काही वेळातच माहिती मिळालेली संशयास्पद कार येताना दिसली. पोलीस पथकाने रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करून कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अमन अभिमन अलोने (वय २३ वर्षे, रा. मातावार्ड, देसाईगंज) असे सांगितले.
पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर कारची कसून झडती घेतली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचे साठे लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी या कारवाईत देशी दारू (संत्री कंपनी – ९० एम.एल.): २५ खरड्याचे बॉक्स (एकूण २,५०० प्लास्टिक बॉटल्स) – किंमत अंदाजे २,००,०००/- रुपये, मारुती सुझुकी रिट्झ कार (VXI – क्र. MH 20 BC 8161): किंमत अंदाजे ४,००,०००/- रुपये, असा एकूण ६,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेल्या दारूच्या साठ्याबाबत पोलिसांनी कार चालकाकडे सखोल चौकशी केली असता, हा दारूचा साठा गांधीवार्ड, देसाईगंज येथील रहिवासी आशिष नरेंद्र डाहाट (वय ३७ वर्षे) याचा असल्याची कबुली त्याने दिली. यावरून देसाईगंज पोलीस ठाण्यात आरोपी अमन अलोने आणि फरार आरोपी आशिष डाहाट यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक ३५७/२०२६, कलम ६५ (अ), ८३, ९८ (२) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. संदीप आगरकर करीत आहेत.
सदरची कारवाई देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि. संदीप आगरकर, पोलीस अंमलदार नितेश कडव, विलास विधाते, महिला पोलीस शिपाई सारमपल्लीवार आणि चालक पोलीस हवालदार राऊत यांनी केली.



