
एटापल्लीत महिलांचा व्यसनमुक्तीचा संकल्प ; मुक्तीपथ शहर संघटनेच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम
एटापल्ली : “दारूचे व्यसन हे केवळ व्यक्तीलाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक घसरण होण्यामागे व्यसनाधीनता हे मुख्य कारण आहे. त्यामुळे जर संसार सुखी करायचा असेल, तर व्यसनांपासून दूर राहणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन एटापल्ली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रेखा मोहुर्ले यांनी केले.
एटापल्ली येथील माळी समाज भवन येथे ‘मुक्तीपथ शहर संघटने’च्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू, सत्कार समारंभ आणि व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार हेमंत गांगुर्डे लाभले होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, दारू, तंबाखू आणि खर्रा यांसारखी व्यसने मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे केवळ आरोग्यच बिघडत नाही, तर कष्टाने कमावलेला पैसाही वाया जातो. निरोगी आणि समाधानी आयुष्यासाठी प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्तीचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम मडावी यांनी शहरात दारू आणि अंमली पदार्थांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे ग्वाही दिली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महिला संघटनांनी आणि सुजाण नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला वार्ड क्र. ७ ते १४ मधील मुक्तीपथ शहर संघटनेच्या ७९ महिला सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा समारोप सर्वांनी ‘व्यसनमुक्तीची शपथ’ घेऊन आणि एकमेकींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तीपथचे तालुका संघटक किशोर मलेवार, उपसंघटक आकाश भोयर आणि प्रेरक समीक्षा कूळमेथे यांनी परिश्रम घेतले.

उल्लेखनीय कार्याचा गौरव
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये हेमंत गांगुर्डे (तहसीलदार, एटापल्ली),* मोतीराम मडावी (सहाय्यक पोलीस निरीक्षक), रेखा मोहुर्ले (नगराध्यक्ष), विजया जंबोजवार, शशिकला वर्गंटीवार आणि उषाताई ठाकरे (माजी नगरसेविका) यांचा समावेश होता.



