गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन वर्षांत १ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट; ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत लोकचळवळ उभारण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लॉयड मेटल्सकडून ११ लाख वृक्षांची लागवड; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक

गडचिरोली : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन वर्षांत १ कोटी वृक्ष लागवड करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. सर्व शासकीय व खाजगी संस्थांसोबतच लोकचळवळीतून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.

‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियान अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, कुशल जैन, नमन गोयल, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्यामुळे शासनामार्फत एक कोटी वृक्षलागवड तर लॉयड मेटल्स या कंपनीद्वारे अकरा लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना पंडा यांनी दिल्या. वृक्षारोपणात किमान दीड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्याचे, रोपे लावल्यावर ती जगतील व वाढतील यासाठीदेखील विशेष प्रयत्न व नियोजन करण्याचे तसेच भविष्यात वृक्षरोपणासाठी नर्सरीत रोपे विकसित करण्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत रेशीम विभाग, वनविभाग, कृषी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आदी शासनाच्या विविध विभागांना तसेच सामाजिक संस्थांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. यावेळी विविध विभागांचे संबंधित अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मोहिमेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या हरितक्रांतीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button