महाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र सौर पॅनेल निर्मितीत आघाडीवर ; ग्रीन स्टील धोरणासाठी समिती स्थापन होणार

मुंबई : महाराष्ट्र हे सौर पॅनेल निर्मिती क्षेत्रात देशात आघाडीवर असून या कामामुळे एक मोठी ‘ग्रीन इकोसिस्टीम’ निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, ग्रीन स्टील हे नवीन क्षेत्र असल्याने या संदर्भात धोरण तयार करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची १३ वी बैठक सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत उपस्थित होते.

सौर पॅनेल निर्मिती आणि ग्रीन स्टील: राज्याने सौर पॅनेल निर्मितीमध्ये आघाडी घेतली असून, ग्रीन स्टील संदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग: कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगास सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोठे, विशाल व अतिविशाल उद्योगांना प्रथम्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

वस्त्रोद्योग आणि कर सवलत: जागतिक कर संरचनेतील बदलांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील वस्त्रोद्योगावर झालेल्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, विद्युत शुल्क सवलतीची औद्योगिक अनुदानातून वजावट केली जाणार नाही. कॅप्टीव्ह प्रोसेस व्हेंडर सुधारणा: विदर्भ आणि मराठवाडा या वर्गीकृत क्षेत्रांकरिता कॅप्टीव्ह प्रोसेस व्हेंडर संदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

खेड तालुक्याला लाभ: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे वर्गीकरण “अ” व “क” वर्गीकृत तालुका क्षेत्रात करण्यात आले असल्याने खेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व खेड डेव्हलपर्स लि. यांना “क” वर्गीकृत तालुक्याचे फायदे लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन: मे. ओपी मोबिलीटी एक्सटेरिअर इंडिया प्रा. लि. या कंपनीत ९० टक्के महिला कार्यरत असल्याने आणि तिने पुणे जिल्ह्यातील कामगारांना रोजगार मिळवून दिल्याने, या कंपनीस मोठ्या प्रकल्पांचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. थ्रस्ट सेक्टर धोरण: ग्रीन स्टील संदर्भात नियुक्त होणाऱ्या समितीने थ्रस्ट सेक्टर धोरणांतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन देय करण्यासंदर्भात विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास) असिमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, सचिव (उद्योग) डॉ. पी. अन्बळगन, सचिव (वस्त्रोद्योग) अंशू सिन्हा, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button