गडचिरोलीविदर्भ

एसएससी परीक्षेत वसंत विद्यालयाचा आयुष ब्राह्मणवाडे जिल्ह्यात अव्वल

चांदा शिक्षण मंडळाच्या वसंत विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ; ८३.७८ टक्के निकाल

गडचिरोली: चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोलीने एसएससी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. आज ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालात विद्यालयाचा ८३.७८ टक्के निकाल लागला असून, विद्यार्थी आयुष सचिन ब्राह्मणवाडे याने ९७.६० टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या परीक्षेत कु. योगेश्वरी मनिष क्षिरसागर हिने ९३.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर वेदांत पुरुषोत्तम भंडारे याने ९३.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. विद्यालयातून एकूण १११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, १० विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर २७ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणीत यश संपादन केले आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अशोक सिंह, उपाध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, सचिव अशोक पुल्लावार आणि संस्थेच्या इतर सर्व मान्यवर सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या अभिनंदन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मेघश्याम लांजेवार यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button