
माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात जोरदार शक्तीप्रदर्शन; २० जून रोजी होणार मतदान
अहेरी : अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मधील रिक्त जागेसाठी लागलेल्या पोटनिवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) अधिकृत उमेदवार म्हणून माया शंकर येल्लूरकर यांनी सोमवारी (दि.२५) माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. उमेदवारी अर्ज भरताना भाजप कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अहेरी शहरात मोठे शक्तीप्रदर्शन केले.
अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग ९ मधील भाजपच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सुनीता किशोर मंथनवार यांचे काही महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या जागेसाठी येत्या २० जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, भाजपने पुन्हा एकदा हा गड राखण्यासाठी कंबर कसली आहे.
अहेरी राजघराण्याचे वंशज आणि माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी (नगरपंचायत अहेरी) यांचे कार्यालय गाठले आणि माया येल्लूरकर यांचा अर्ज दाखल केला. प्रभाग ९ मधील विकासकामांची मालिका सुरू ठेवण्यासाठी आणि सुनीता मंथनवार यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी भाजप ही निवडणूक ताकदीने लढणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान अहेरी शहरातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पोटनिवडणुकीमुळे अहेरी शहरात ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.



