गडचिरोलीविदर्भ

आदिवासी खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करावे – प्रकल्प अधिकारी रणजित यादव

गडचिरोली प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन ; ४१ आश्रमशाळांतील ११०० खेळाडूंचा सहभाग

गडचिरोली : अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळामधील खेळाडूवृत्तीतून जीवनातील चढ उताराला सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होऊन यश मिळते. छत्तीसगडच्या आदिवासी धावपटू अनिमेष कुजूरने राष्ट्रीय स्तरावरील १०० मीटर धावणे स्पर्धेचा रेकॉर्ड मोडल्याची बाब भूषणावह आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नावलौकिक करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत आयोजित तीन दिवसीय प्रकल्प स्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर क्रीडाज्योत प्रज्वलित करून थाटात पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम, उपाध्यक्ष रोशन कुमरे, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्राचार्य परशुराम वांगदरे, अनिल सोमनकर, मंगेश ब्राह्मणकर, सुनील नन्नेवार, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेतील मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. संमेलनातील उद्घाटनीय व्हॉलीबॉल सामना सोडे व कोरची या बिट संघादरम्यान झाला, ज्यात कोरची संघ विजयी ठरला.

या तीन दिवसीय संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटांमधील २४ शासकीय आणि १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळांतील सुमारे अकराशे (११००) खेळाडूंचा सहभाग आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन करण्यात आले असून, यातून आदिवासी विद्यार्थ्यांचे सुप्त क्रीडा कौशल्य प्रदर्शित होणार आहे.

कार्यक्रमाचे संचालन संतोष कन्नाके यांनी तर आभार प्रदर्शन अतुल बलगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक देविदास चोपडे, अधिक्षिका निमा राठोड, गुलाब डोंगरवार, निलेश कळंब, डाकराम धोंगडे, सविता शेंडे, रामदास पिल्लारे, शारदा कोटांगले, दिनेश येरमे, भूषण खोब्रागडे, जागृती टेकाम, पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक आशिष नंदनवार, रविकांत पिपरे, सुधीर म्हशाखेत्री, संतोष गैनवार, अजय वाकडे, जितू खोब्रागडे, नवाज शहा, संदीप उसेंडी, कृपांती बोरसरे, प्रवीण पोटावी, शैलेश भैसारे, राजेश लांडगे, कार्तिकस्वामी जावळे, गणेश लेनगुरे, भूपेंद्र गेडाम आदींसह क्रीडा शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button