
तिघेही गंभीर जखमी ; कालीमाटी येथील घटना
गोंदिया : कुंपणाचा कचरा पडत असल्याने त्यावरून वाद झाल्याने वादात तरुणाने तिघांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. दिवाळीच्या तोंडावर सोमवारी (दि. २८) सायंकाळी ६ च्या दरम्यान आमगाव तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे ही घटना घडली.
सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास राजेश पीतांबर शेंडे (२८), दीक्षा राजेश शेंडे (२६) व कांता पीतांबर शेंडे (५२, रा. कालीमाटी) हे तिघेही घरी असताना आरोपी राजहंस जयराम ब्राह्मणकर (३९, रा. कालीमाटी) हा त्यांच्या घरी गेला व कुंपणाचा कचरा आमच्या घरी पडतो, असे म्हणत जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर रागाच्या भरात त्याने कुऱ्हाडीने वार करून तिघांना गंभीर जखमी केले. या घटनेसंदर्भात राजेश पीतांबर शेंडे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आरोपी राजहंस ब्राह्मणकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१, (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अक्षय वळसे करीत आहेत.



