गडचिरोलीविदर्भ

श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयात प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा

प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा ; सहकाऱ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आठवणींना दिला उजाळा

अहेरी : येथील प्रतिष्ठित श्री शंकरराव बेझलवार महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख आणि आयक्यूएसी (IQAC) समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र डी. हजारे यांचा प्रदीर्घ व निष्कलंक सेवापूर्ती निमित्त भव्य निरोप व सत्कार समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सोमकुवर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच अत्यंत भावुक वातावरणात पार पडला. डॉ. हजारे यांनी २० नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०२६ या प्रदीर्घ कार्यकाळात महाविद्यालयाच्या शैक्षणिक व गुणात्मक विकासात आपले मोलाचे योगदान दिले आहे.

या सोहळ्याचे औचित्य साधून डॉ. रवींद्र हजारे सर व त्यांच्या अर्धांगिनी सौ. संध्या हजारे यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व सहकाऱ्यांनी सरांच्या तब्बल १२ वर्षांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देणारा आणि त्यांच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा एक विशेष व्हिडिओ प्रोजेक्टरवर सादर केला. हा भावनिक क्षण उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारा ठरला.

कार्यक्रमाला डॉ. चिन्नना चालूरकर (प्राचार्य, आर. डी. सायन्स कॉलेज), डॉ. विष्णू सोनोणे (प्राचार्य, भगवंतराव शिक्षण महाविद्यालय), डॉ. रंजना लाड (प्राचार्या, आर. डी. कॉलेज नागेपल्ली) उपस्थित होते. सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अरविंद सावकार पोरेड्डीवार, सचिव प्रशांतभाऊ पोटदुखे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्ती डॉ. हजारे सरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील आरोग्यदायी व समृद्ध वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक वरिष्ठ प्राध्यापक प्रा. चंद्रशेखर गौरकार यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गीतांजली बंडावार यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. सोनाली वाघ, प्रा. अनुराग तुंडुलवार, प्रा. निलेश गर्गम आणि विशेष व्हिडिओ निर्मितीसाठी प्रा. शामल बिश्वास यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सांगतेपूर्वी उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील मान्यवरांच्या वतीने प्रा. गौरव तेलंग यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button