
गडचिरोली : शहरातील स्थानिक जय छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप यांच्या सौजन्याने दरवर्षी मोठया उत्साहात, धूम धडक्यात ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ साजरा केला जातो. भारताचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती निमित्ताने “शिवजन्मोत्सव सोहळा”नेहरू वार्ड द्वाराका नगरी येथील भव्य पटांगणात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

‘जय भवानी, जय शिवाजी,‘ छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला गेला होता. ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ या कार्यक्रमा निमित्ताने भगवा रंग फेम सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या गीताच्या दमदार सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे संपूर्ण गडचिरोली नगरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ निमित्ताने भक्तिमय झाली होती.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, युवा नेते अवधेशरावबाबा आत्राम, सागर निंबोरकर व अनेक पाहुणे मंडळी आणि हजारोच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्तगण उपस्थित होते.



