शिवणी येथे तरुणी आढळली बेशुद्धावस्थेत

अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज
गडचिरोली : तालुक्यातील शिवणी येथे गावाबाहेर शौचासाठी गेलेली युवती बेशुध्दावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिचे डोळे, कान आणि छातीला मुका मार लागल्याने तिला मारहाण करुन अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गडचिराली-चामोर्शी मार्गावरील शिवणी गावातील २३ वर्षीय तरुणी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहे. २ मार्चला संध्याकाळी सहाच्या सुमारास ती गावाबाहेर शौचास गेली होती. परंतु, एक तास होऊनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी तिकडे जाऊन बघितले असता ती शौचास गेलेल्या ठिकाणापासून २० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला शेतात बेशुध्दावस्थेत आढळली. तिच्या हाताला जखम झाली होती. शिवाय डोळे आणि कानावर मारहाणीच्या किरकोळ जखमा आढळून आल्या. छातीची बरगळीही थोडी सरकल्याचे जाणवले.
ग्रामस्थांनी तिला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूरला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. या घटनेनंतर गडचिरोली पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पीडित युवतीचे बयाण घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस निरीक्षक सिंगनजुडे यांनी सांगितले.



