
‘गिरोला आयुर्वेदिक दवाखान्या’च्या पथकाचा अभिनव उपक्रम; असंसर्गजन्य आजार व सिकलसेल तपासणी
गोंदिया : सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे (MGNREGA) सुरू असून, गावातील पुरुष व महिला आपल्या आरोग्याची काळजी न करता सकाळीच कामावर जात असतात. ही बाब लक्षात घेऊन, आमगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गिरोला आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुमेश्वर पटले यांच्या कल्पक विचारातून, त्यांच्या पथकाने आज, ९ जून रोजी थेट गिरोला येथील रोजगार हमी कामाच्या ठिकाणी जाऊन तेथेच मजुरांच्या आरोग्याची तपासणी केली.
यावेळी काम करणाऱ्या लोकांची असंसर्गजन्य कार्यक्रम अंतर्गत रक्तदाब व मधुमेह तपासणी, तसेच सिकलसेल रक्त तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भुमेश्वर पटले यांनी दिली.
गिरोला येथील रोजगार हमी कामाच्या ठिकाणी आयोजित या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी गिरोला आयुर्वेदिक दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुमेश्वर पटले, समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी येडे, आरोग्य सेविका दुर्गा फुंडे व तृष्णा उके, आरोग्य सेवक चेतन उईके, आणि आशा कार्यकर्ती सुनंदा रोकडे यांनी आरोग्य सेवा दिली.
शिबिरादरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. भुमेश्वर पटले यांनी असंसर्गजन्य आजार (उदा. रक्तदाब, मधुमेह), संतुलित आहार व जीवनशैलीचे महत्त्व, तसेच कीटकजन्य व जलजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही याबाबत मार्गदर्शन व समुपदेशन केले. या अभिनव उपक्रमामुळे रोजगार हमीवरील मजुरांना कामाच्या ठिकाणीच आरोग्याची तपासणी आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.



