
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम ; गेल्या तीन महिन्यांत ९९० प्रमाणपत्रांचे वितरण; ‘शासन आपल्या दारी‘ संकल्पनेला बळकटी
गडचिरोली : जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा आणि त्यांचे जीवनमान उंचावावे, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नुकतेच दोन टप्प्यांत विशेष दिव्यांग तपासणी शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरांना जिल्हभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शेकडो दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून जागेवरच तपासणी करण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ आणि २७ मार्च रोजी हे विशेष अभियान राबवण्यात आले. २३ मार्च रोजी एकूण ८२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी ४५ लाभार्थी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले. २७ मार्च रोजी एकूण १२२ व्यक्तींपैकी ६१ दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्या. अशा प्रकारे, या दोन दिवसांत एकूण १०६ दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली.
या शिबिरात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया विके यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. परीक्षित चकोले, डॉ. बाळू सहारे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने विविध प्रकारच्या अपंगत्वाची सखोल तपासणी करून तातडीने वैद्यकीय अभिप्राय नोंदवले. यामुळे लाभार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी लागणारी क्लिष्ट प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि जलद झाली.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिव्यांग विभागाने मागील तीन महिन्यांत विक्रमी कामगिरी केली आहे. या कालावधीत एकूण ९९० दिव्यांग प्रमाणपत्रांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे. “भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातील, जेणेकरून एकही गरजू दिव्यांग नागरिक शासकीय लाभापासून वंचित राहणार नाही,” अशी माहिती डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह तहसील कार्यालय, गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नागापुरे, वैभव चंडोले, रामू चव्हाण, केशव होळंबे आणि श्री तरुण पटले यांच्यासह संपूर्ण टीमने या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांना आता पेन्शन, बस सवलत आणि इतर विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.



