गोंदियाविदर्भ

‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत गंगाझरी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; एका मिनिटात लावली ११११ झाडे!

तिरोडा : स्मार्ट ग्रामपंचायत गंगाझरीने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत कृषी महोत्सव आयोजित करत एक अनोखा उपक्रम राबवला. शनिवारी (६ जुलै) एकाच मिनिटात तब्बल ११११ झाडे लावण्याचा विक्रम या ग्रामपंचायतीने केला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, फरेंद्र कुटीकर, जिल्हा प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, गटविकास अधिकारी मडामे आणि पंचायत समिती सदस्य वंदना पटले प्रमुख उपस्थित होते.

या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत परिसर, बाजार चौक आणि गावातील प्रमुख मार्गांच्या कडेला विविध प्रजातींच्या फळझाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी लावण्यात आलेल्या रोपट्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण संरक्षण करण्याची उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. या एक मिनिटातील वृक्षारोपणाने एकूण ५० हजार वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी सरपंच घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनरेगा सहायक कार्यक्रम अधिकारी रहांगडाले, अभियंता भुवन पेशने, ग्रामपंचायत सदस्य बिंदाबाई उईके, लक्ष्मी उपवंशी, सुरेश निमजे, ग्रामपंचायत अधिकारी डी. के. महाकालकर यांच्यासह गावातील नागरिक, युवक, विद्यार्थी, शिक्षक, कृषी विभाग, माविम व उमेद कर्मचारी, बचत गटातील महिला, विविध ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच घरडे यांनी केले, तर आभार महाकालकर यांनी मानले.

‘सीड्स बॉल’ तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

या कार्यक्रमाचे औचित्य साधून उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये १०० हून अधिक देशी प्रजातीचे ‘सीड्स बॉल’ तयार करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथ्या व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button