
वर्धा : पोलिसांनी सापळा रचून नाकाबंदी केली आणि पोलिसांना पाहताच दारू वाहून आणणाऱ्यांनी वाहन सोडून धूम ठोकली. पोलिसांनी वाहन, दारूसाठ्यासह तेरा लाख चार हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे अँटी गैंग सेल पथक, हिंगणघाट आणि वर्धा विभाग पथक अशी तीन पथके देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होती. दरम्यान, मुखबिरकडुन मिळालेल्या गोपनिय माहितीवरून देवळी येथील प्रमोद धात्रक हा त्याचा साथीदार चालकासह क्रमांक एमएच ४० केआर ८३७८ क्रमांकाच्या वाहने अमरावती जिल्ह्यातून देवळी येथे देशी, विदेशी दारूसाठा घेवून चिल्लर विक्री करण्याचे उद्देशाने त्याची चोरटी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी देवळी ते नंदोरा मार्गावर तीन चारचाकी वाहनांनी नाकाबंदी केली. दरम्यान, आरोपी स्कार्पिओ गाडी चालकास पोलीस दिसताच वाहन जागीच उभे करून आरोपी प्रमोद धात्रक रा. दोन्ही देवळी हे मोक्यावरून पसार झाले. शोध घेतला असता मिळून आले नाही. वाहनात देशी, विदेशी दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी दारूसाठा, वाहनासह १३ लाख ४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, यशवंत गोल्हर, प्रमोद पिसे, महादेव सानप, रितेश शर्मा, अरविंद इंगोले, मंगेश आदे यांनी केली.



