
लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
लाखांदूर : मावस भावाकडून होणाऱ्या अत्याचाराला आणि मावशीच्या कुटुंबाकडून मिळत असलेल्या धमक्यांना कंटाळून लाखांदूर तालुक्यातील मोहरणा गावात एका २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली असून, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमुळे हे प्रकरण उघडकीस आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मावस भाऊ राजेश गजभिये हा तरुणीचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. तसेच, त्याला विरोध केल्यास संपूर्ण कुटुंब धमक्या देत होते. या त्रासाला कंटाळून तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलले. पीडित तरुणीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, तालुक्यातील इटाण येथील राजेश रमेश गजभिये, त्याची आई नंदा रमेश गजभिये, भाऊ राहुल रमेश गजभिये, वडील रमेश गजभिये आणि कुटुंबातील एक महिला अशा एकूण ५ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीने लिहिलेली चिठ्ठी जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे.



