गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

गडचिरोली पोलीस दलातील ३१ जवानांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर ; ३९४ अंमलदारांना पदोन्नतीची भेट

बोरीया-कसनासूर येथील चकमकीची दखल ; कर्तव्यनिष्ठेचा गौरव

गडचिरोली : नक्षलवादाविरुद्धच्या लढाईत आपल्या प्राणांची बाजी लावून शौर्य गाजवणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. २२ एप्रिल २०१८ रोजी गाजलेल्या ‘बोरीया-कसनासूर’ चकमकीत ४० माओवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ३१ पोलीस अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपतींचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. याचसोबत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नतीचा बहुमान देऊन त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला आहे.

बोरीया-कसनासूर चकमकीतील धैर्याचा सन्मान २२ एप्रिल २०१८ रोजी मौजा बोरीया-कसनासूर येथे झालेल्या ऐतिहासिक चकमकीत गडचिरोली पोलिसांनी अत्यंत धाडसी कामगिरी केली होती. या कारवाईत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडत ४० माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने खालील प्रमुख ३१ जवानांना पदक जाहीर केले आहे. यामध्ये अधिकारी: पोनि. अमोल फडतरे, पोउपनि. मधुकर नैताम, पोउपनि. वासुदेव मडावी. प्रमुख अंमलदार: सफौ विलास पोरतेट, संतोष नैताम, विश्वनाथ सडमेक, ज्ञानेश्वर तोरे, दिलीप सडमेक, रामसू नरोटे, आनंदराव उसेंडी, राजू चव्हाण, मोहन उसेंडी, संदीप वसाके, अरुण मेश्राम, सुधाकर वेलादी, नितेश वेलादी, विश्वनाथ मडावी, कैलास कोवासे, हरीदास कुलयेटी, किशोर तलांडे, अतुल मडावी, अनिल आलाम, नरेंद्र मडावी, आकाश ऊईके, घिस्सू आत्राम, राजू पुसाली, महेश जाकेवार, रुपेश कोडापे, मुकेश सडमेक, योगेंद्रराव सडमेक आणि कारे आत्राम. यांचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत ०३ शौर्य चक्र आणि २१७ पोलीस शौर्य पदके प्राप्त करून देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही दिलासा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस दलातील ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. १० अंमलदारांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी वेगवर्धित पदोन्नती मिळाली आहे. ८२ पोलीस हवालदारांना ‘सहाय्यक पोलीस उप-निरीक्षक’ पदी, तर ३२० पोलीस नाईकांना ‘पोलीस हवालदार’ पदी बढती देण्यात आली. विशेष म्हणजे, देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या १४ शहीद पोलीस अंमलदारांना देखील मरणोत्तर पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. यात ७ हवालदार आणि ७ नाईक पदावरील जवानांचा समावेश आहे.

या दैदीप्यमान यशाबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी सर्व पदक विजेत्यांचे आणि पदोन्नती प्राप्त जवानांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button