भंडाराविदर्भ

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विजयी

ब्राह्मणकर यांना ३०२ तर नरेश ईश्वरकर यांना १५४ मते; वैनगंगा सभागृहात शांततापूर्ण वातावरणात मतमोजणी

भंडारा : महाराष्ट्र विधान परिषद भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी ३०२ मते मिळवून दणदणीत विजय संपादन केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वैनगंगा सभागृहात सकाळी ८ वाजता अत्यंत शांततापूर्ण, सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना अधिकृतपणे विजयी प्रमाणपत्र प्रदान केले आहे.

या निवडणुकीत एकूण ४५७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीअंती भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांना सर्वाधिक ३०२ मते मिळाली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार नरेश ईश्वरकर यांना अवघी १५४ मते मिळवता आली; तर निवडणुकीच्या रिंगणातील तिसरे उमेदवार सचिन कुंभलकर यांना एकही (शून्य) मत प्राप्त झाले नाही. एकूण ४५७ मतांपैकी १ मत अवैध ठरल्याने ४५६ वैध मतांच्या आधारे हा निकाल घोषित करण्यात आला.

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील चार मुख्य मतदान केंद्रांमधून एकूण ४५७ मतपत्रिका मतमोजणीसाठी प्राप्त झाल्या होत्या. त्याचा केंद्रनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे: भंडारा केंद्र: १६६ मते, गोंदिया केंद्र: १५४ मते, सडक-अर्जुनी केंद्र: ७६ मते, साकोली केंद्र: ६१ मते

सदर मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निरीक्षक नितीन पाटील आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विकास व्यवहारे, उपजिल्हाधिकारी जे.पी. लोंढे, नायब तहसीलदार (निवडणूक) रोशनी दिघोरे यांच्यासह निवडणूक विभागाचे सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजयी घोषित झाल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांच्या समर्थकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच जल्लोष केला. या विजयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button