
६ हजार तिरंगे उपलब्ध; नागरिकांना राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन
गडचिरोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला गडचिरोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नगर परिषदेने या अभियानांतर्गत नागरिकांसाठी ६,००० तिरंगे उपलब्ध करून दिले असून, त्यांची विक्री आणि वितरण मोहीम वेगात सुरू आहे.
नगर परिषदेने राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत तेजस्वी शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून आठवडी बाजारातील गाळा क्रमांक २६ आणि २७ तसेच कारगिल चौकात तिरंग्यांचे वितरण केंद्र सुरू केले आहे. याशिवाय, नगर परिषद कार्यालयात आणि नोंदणीकृत बचतगटांच्या मदतीने घरोघरी ध्वज वितरणाची विशेष मोहीमही राबवली जात आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या उपक्रमातून देशभक्तीची भावना जागृत करून राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक असलेल्या या अभियानाला यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.



