
बाघनदीवरील कोरणीघाट, रजेगाव येथील संभाव्य पूरग्रस्त भागाची केली पाहणी
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याने मान्सून कालावधीत पूर परिस्थितीचे आव्हान पेलण्यासाठी पूर्ण ताकदीने तयारी केली आहे, मात्र अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी १९ जून रोजी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या बाघनदीवरील कोरणीघाट, रजेगाव येथील संभाव्य पूरग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान केले.
जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका असून, मान्सूनने हजेरी लावल्यामुळे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पूरप्रवण भागात भेट देऊन मान्सूनपूर्व तयारीचे नियोजन आणि भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत तहसीलदार गोंदिया समशेर पठाण, रावणवाडीचे पोलीस निरीक्षक वैभव पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, मंडळ अधिकारी, तलाठी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
गोंदिया तालुक्यातील कोरणीघाट येथे ८ जून रोजी नदीपात्रात पाण्यात बुडून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची जिल्हाधिकारी नायर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि तात्काळ भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट, कोरणीघाट, रजेगाव यांना भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि अप्रिय घटना टाळण्यासाठी १० लाईफ जॅकेट, ५ लाईफबॉय आणि एक रोप बंडल प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून प्रदान करण्यात आले. तसेच, सदर ट्रस्टच्या सदस्यांना या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.
पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे, असे सांगत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी आवाहन केले की, “आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. प्रशासन आणि नागरिक हे समाजातील एकाच घटकाचे दोन बाजू आहेत. अशा परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासन आणि नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे.” जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे मान्सून काळातील संभाव्य धोके कमी होऊन नागरिकांचे जीवनमान सुरक्षित राहील अशी अपेक्षा आहे.



