क्राईमचंद्रपूरविदर्भ

बार मॅनेजरने मारला १८ लाखांचा डल्ला ; स्टॉक रजिस्टरमध्ये फेरफार करून केला अपहार

चंद्रपूर : शहरातील रामनगर परिसरात एका नामांकित बारच्या मॅनेजरने मालकाचा विश्वास संपादन करून तब्बल १८ लाख ५४ हजार रुपयांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मद्याच्या साठ्यात (Stock) फेरफार करून हा मोठा आर्थिक अपहार करण्यात आला असून, रामनगर पोलिसांनी याप्रकरणी मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी जितेंद्र चंद्रकुमार तलरेजा (५५) यांचा नागपूर रोड आणि मुल रोड परिसरात ‘लोहारा जंक्शन बार अँड रेस्टॉरंट’ नावाचा व्यवसाय आहे. त्यांनी बारचा संपूर्ण कारभार मॅनेजर दीपक नारायण अडपेवार याच्याकडे सोपविला होता. २४ डिसेंबर २०२५ रोजी जेव्हा तलरेजा यांनी स्टॉक रजिस्टरची तपासणी केली, तेव्हा क्लोजिंग आणि ओपनिंग स्टॉकमध्ये मोठी तफावत आढळली. सखोल चौकशीत असे समोर आले की, ऑक्टोबर २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या दरम्यान आरोपीने विदेशी मद्याच्या नोंदींमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केला होता. एकूण १८ लाख ५४ हजार रुपयांचा हिशोब गायब असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

अपहार उघडकीस आल्यानंतर मॅनेजर दीपकने ही रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याने मालकाला विश्वासासाठी तीन धनादेश (Cheques) देखील दिले. मात्र, पैसे परत करण्याऐवजी त्याने मालकालाच उलट कायदेशीर नोटीस पाठवली. आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच तलरेजा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

रामनगर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६, ३१८ (४) व ३३६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button