गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भसामाजिक

गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने आत्मसमर्पित महिला नक्षलवादी अडकली लग्नबंधनात

सर्वसामान्य गडचिरोलीकर तरुणाने घेतला आत्मसमर्पित महिला नक्षलवादीसोबत लग्नगाठ बांधण्याचा धाडसी निर्णय

गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर जे नक्षलवादी विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतात त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करत असते. याचाच एक भाग म्हणून 16 ऑगस्ट रोजी मागील वर्षी आत्मसमर्पित झालेली जहाल महिला नक्षलवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिचा एलाराम येथील कैलाश मारा मडावी याचेसोबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत व पुढाकाराने विवाह संपन्न झाला.

सलग 14 वर्षे नक्षलवाद्यांच्या विविध सशस्त्र माओवादी दलममध्ये कार्यरत राहून एरीया कमिटी मेंबर पदापर्यत पोहोचलेली जहाल महिला नक्षलवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी (वय 28) रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना व सामाजिक उपक्रमांच्या प्रभावशाली अंमलबजावणीमुळे तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या तीव्र नक्षलवादविरोधी अभियानांमुळे व हिंसाचाराच्या जिवनाला कंटाळून मागील वर्षी 07 ऑक्टोबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. रजनी हिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकुण 11 लाख रुपयांचे बक्षीस होते.

आत्मसमर्पण केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच आत्मसमर्पितांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल करुन घेण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नीशिल असते. गडचिरोली जिल्ह्यातील शेती करुन सर्वसामान्य आयुष्य जगणारा तरुण कैलास मारा मडावी (वय 26), रा. एलाराम, पोस्ट-पेठा (देचलीपेठा), ता. अहेरी याने व रजनी या दोघांनी परस्पर संमतीने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला गडचिरोली पोलीस दलाने पाठिंबा देऊन त्या दोघांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याकरिता 16 ऑगस्ट रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदीरात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत आणि पाठिंब्याने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पाडण्यात आला. सदर विवाह सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी उभयतांना आशीर्वाद देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सदरचा विवाह संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी, नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button