
कुरखेडा : नगरपंचायतीची ५५ वर्षे जुनी प्रशासकीय इमारत धोकादायक झाली असून तिच्या तातडीच्या संरचनात्मक तपासणीची मागणी आम आदमी पार्टीने (AAP) केली आहे. जिल्हा कोषाध्यक्ष इरफान पठाण यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ कार्यकर्त्यांनी आज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांना निवेदन दिले.
हे निवेदन सादर करताना ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीची सध्याची स्थिती निदर्शनास आणून दिली. १९७० मध्ये बांधलेल्या या इमारतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत, तसेच स्लॅबमधून कॉंक्रीटचे तुकडे खाली पडत आहेत. त्यामुळे या इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. केवळ रंगरंगोटी करून इमारत वापरली जात असल्याने तिची संरचनात्मक कमकुवतता वाढत आहे. यामुळे ही इमारत महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक टाउनशिप अधिनियम, १९६५ (कलम १७९) आणि UDCPR 2020 (नियम ६.१०) नुसार C-1 श्रेणीतील धोकादायक इमारत मानली जाऊ शकते.
या संदर्भात, ‘आप’ने तातडीने सिव्हिल इंजिनिअर किंवा तांत्रिक समितीमार्फत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करण्याची मागणी केली आहे. या ऑडिटच्या अहवालानुसार, आवश्यक दुरुस्ती करणे किंवा इमारत धोकादायक आढळल्यास ती पाडण्याची कारवाई करणे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत तपासणी होत नाही, तोपर्यंत इमारतीचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहनही ‘आप’ने केले आहे. तसेच, या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) किंवा जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधावा आणि राज्य सरकारच्या इमारत दुरुस्ती निधीचा वापर करावा, असेही सुचवण्यात आले आहे.

याप्रसंगी ‘आप’चे जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी, सचिव अमृत मेहेर, जिल्हा कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार, संघटक ताहिर शेख, सहसंघटक चेतन गहाणे, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आणि सदस्य अंकुश मडावी उपस्थित होते.
इरफान पठाण यांनी सांगितले की, “सार्वजनिक सुरक्षिततेसाठी ही कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘आम आदमी पार्टी’ नेहमीच नागरिकांच्या हक्कांसाठी लढते आणि प्रशासनाला त्यांच्या कामासाठी जबाबदार ठेवते.” मुख्याधिकारी राजकुमार धनबाते यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून, लवकरच तपासणीसाठी एक समिती गठित करण्याचे आश्वासन दिले आहे. ‘आप’च्या या पुढाकारामुळे कुरखेडा शहरातील नागरिकांमध्ये इमारतीच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली आहे.



