
प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी गावालगतच्या वैनगंगा नदी परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या आशेने उन्हाळी मका आणि धानपिकाची लागवड केली होती. मात्र, अचानक आलेल्या वादळ आणि गारपिटीने या हिरव्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.
गारपिटीमुळे अनेक ठिकाणी उभे पीक जमीनदोस्त झाले असून, ते आता कापणीयोग्यही राहिलेले नाही. त्यामुळे जे थोडेफार पीक वाचले आहे, त्याची कापणी करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी दिलखुश बोदलकर आणि इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसान रब्बीत भरून काढण्याची अपेक्षा ठेवत उन्हाळी पिकांची लागवड केली होती. परंतु, गारपीट आणि वादळी पावसाने होत्या नव्हत्याचे केले.
अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे झाले असले तरी, मदती कधी मिळेल या चिंतेत ते आहेत. कृषी सहाय्यक एस.बी. निमगडे, तलाठी शहारे आणि कोतवाल जवादे यांनी नुकसानीची पाहणी केली असून, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित भरपाईची मागणी केली आहे.



