
उमेद बचत गटातील महिला व विद्यार्थ्यांना डास आणि आजारांबाबत सखोल मार्गदर्शन
गोंदिया : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, जिल्ह्यामध्ये जुलै महिना ‘डेंग्यू प्रतिरोध महिना’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत डेंग्यू आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आश्रमशाळांमध्ये आरोग्य विभागामार्फत किटकजन्य आजारांबाबत जनजागृती केली जात आहे.
याच मोहिमेचा भाग म्हणून, २८ जुलै रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम जंगलव्याप्त गोठणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावमार्फत ‘उमेद बचत गट’ मधील महिलांना आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हिवताप-डेंग्यू आजाराबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील आरोग्य सहाय्यक संतोष पारधी आणि अमोल मालेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना, तसेच ग्रामपंचायत सभागृहात उमेद बचत गटातील महिलांना बॅनर व पोस्टरच्या माध्यमातून डासांचे प्रकार आणि त्यापासून होणारे आजार, त्यांची लक्षणे, तसेच डासांचे जीवनचक्र अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांना अॅनोफिलीस मादी, एडीस आणि क्युलेक्स इत्यादी कीटक ओळखण्यासंबंधी माहिती देण्यात आली. हिवताप आजाराबाबत डासांचे जीवनचक्र, पाण्यात डासांची होणारी वाढ, डासामध्ये प्लासमोडियम जंतूची वाढ आणि हिवताप जंतू भारीत परिपक्व प्रौढ डास मानवाला चावल्यानंतर मानवाच्या रक्तात व अवयवात आढळणारे बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी गप्पी मासे व लारवा (डास अळी) यांचे प्रात्यक्षिक दाखवून मलेरिया जैविक नियंत्रण कसे करावे, याची माहिती देण्यात आली. तसेच, किटकशास्त्रीय सर्वेक्षण आणि हिवताप नियंत्रणासाठी डासांच्या लार्वा व प्रौढ डासांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा कराव्यात, याची विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या आरोग्य शिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेद प्रभाग संघ गोठणगाव येथे प्रभाग समन्वयक प्रवीण रामटेके, प्रभाग संघ व्यवस्थापक सोनिया वाढई, समूह संसाधन व्यक्ती दीक्षा डोंगरवार व मंजुषा हलमारे यांनी सहकार्य केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक जी.के.ढोक, सहाय्यक शिक्षक मारोती कापगते व अशोक कापगते यांनी सहकार्य केले. प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावच्या वतीने आरोग्य सहाय्यक संतोष पारधी व किशोर कुर्वे, आरोग्य सेवक अमोल मालेकर, राजू वघारे व समीर सैय्यद, आरोग्य सहायिका लक्ष्मी मुनेश्वर, आरोग्य सेविका प्रमिला रॉय व नामुर्ते यांनी आरोग्य शिक्षण दिले.



