
चामोर्शी : तालुक्यातील हळदवाही-रेगडी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा पलासपूर येथे वैष्णव संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. ‘राधे-कृष्णा’ मंदिरासमोरील विस्तीर्ण मैदानात पार पडलेल्या या संमेलनाने भाविकांमध्ये भक्तीची नवी ऊर्जा निर्माण केली. या कार्यक्रमाला भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बोलताना सुरेश शहा म्हणाले की, “आजच्या धावपळीच्या युगात अशा धार्मिक कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. वैष्णव संमेलनासारख्या उपक्रमांतून येणाऱ्या नवीन पिढीला आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे महत्त्व समजते. भक्तीमुळे मन प्रसन्न होते आणि जीवनातील कोणतेही कार्य करण्यासाठी नवीन हिंमत व सकारात्मक ऊर्जा मिळते. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
पलासपूर येथील राधे-कृष्णा मंदिरासमोर भाविकांची मोठी गर्दी जमली होती. भजन, कीर्तन आणि धार्मिक विधींमुळे संपूर्ण परिसराचे वातावरण भक्तीमय झाले होते. या संमेलनामुळे केवळ पलासपूरच नव्हे, तर परिसरातील गावांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या सोहळ्याला गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, संमेलन कमिटीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. स्थानिक कमिटीच्या वतीने पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पलासपूर येथील तरुण मंडळी आणि वैष्णव भक्तांनी अथक परिश्रम घेतले. या संमेलनामुळे ग्रामीण भागातील एकोपा आणि सांस्कृतिक एकता अधिक दृढ झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



