
१५ ऑगस्टचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर; प्रत्येक विभागाला जबाबदारी
गोंदिया : गोंदिया येथे १५ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. हा कार्यक्रम कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी नायर म्हणाले की, “स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय अभिमानाचा दिवस आहे. नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारा हा दिवस प्रेरणादायी आणि स्मरणीय करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.”
यावेळी उपस्थित मान्यवरांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था (जनरेटरसह), वैद्यकीय पथक, तसेच संपूर्ण परिसराची स्वच्छता आणि सजावट यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या सुरक्षिततेची आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळावी, असेही त्यांनी सांगितले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग आणि व्यक्तींना पुरस्कार देण्याचेही बैठकीत ठरवण्यात आले. यासाठी संबंधित विभागांनी १० ऑगस्ट २०२५ पर्यंत पुरस्कारासाठीच्या नावांची यादी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावी, असे सूचित करण्यात आले.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.



