
वैरागड : मध्यरात्री पत्नीवर वासल्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतःच्या पोटात चाकू भोसकला. यात दोघेही जखमी अवस्थेत असताना त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे दोघांवरही उपचार सुरू होते. तीन दिवस उपचार घेतल्यानंतर पतीला डिस्चार्ज मिळाला व तो घरी परतला. मात्र, त्याच रात्री पतीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आरमोरी तालुक्याच्या कोजबी येथे ६ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.
ताराचंद येडमे (५५) रा. कोजबी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. ताराचंद येडमे याने २७ फेब्रुवारीच्या रात्री पत्नीवर वासल्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आणि स्वतःलाही चाकूने भोसकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना गडचिरोली येथे उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मात्र, ताराचंद येडमे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना दवाखान्यातून सुटी देण्यात आली. ते घरी परतले. अशातच ५ मार्चच्या रात्री राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली.



