
अहेरी : नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. आता शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून १२ ऑक्टोबरला सांगता होणार आहे. या दरम्यान, एकीकडे मनोभावे देवी मातेची पूजा, आराधना आणि साधना करण्यासोबत दुसरीकडे नऊही दिवस दांडिया तितक्याच जल्लोषात खेळताना तरूणाई दिसते. जिल्हाभरात दांडियाच्या निमित्ताने तरूणाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे.

दरवर्षी प्रमाणे अहेरी येथील हॉकी ग्राउंड येथे नवरात्रीच्या पावन महोत्सव निमित्ताने दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दांडिया कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे होते. आयोजकांनी राजे आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
तसेच अहेरीकरांसाठी यावर्षी सुद्धा नवरात्रीच्या महोत्सव निमित्ताने मोठया आनंदपूर्ण वातावरणात ‘मिनी बाजार’ चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने राजे समर्थक व अहेरीचे नागरिक उपस्थित होते.



