
साल्हे (नांगपूर) गावात दारूविक्रीबंदीचा निर्णय
गडचिरोली : कोटगुल पोलीस स्टेशन अंतर्गत कोरची तालुक्याच्या छत्तीसगड सीमेलगत असलेल्या साल्हे (नांगपूर) येथे ‘मुक्तिपथ गाव संघटन’ आणि ‘शक्तिपथ संघटने’च्या पुढाकाराने दारूविक्रीबंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या दारूविक्रेत्यांना 30 हजारांचा दंड व सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांमधून विक्रेत्यांना बहिष्कृत करण्याचे ठरविण्यात आले आहे.
गावातील एका दारू विक्रेत्याला वारंवार सूचना देऊनही तो ऐकत नव्हता. त्यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाच्या आहारी जात होता, तंटे वाढत होते आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे महिला वर्गाने पुढाकार घेऊन एक बैठक बोलावली आणि संपूर्ण दारू विक्री बंदीचा निर्णय घेतला. या बैठकीत दारूविक्रीबंदी अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर नियम तयार करण्यात आले. यानुसार, जर कोणी पुन्हा दारू विक्री करताना आढळल्यास त्याला तीस हजार रुपये दंड आणि पुढील २० वर्षांसाठी गावातील सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांमधून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कडक निर्बंधांची जाणीव होताच, त्या दारू विक्रेत्याने स्वतः दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी आणि विशेषतः महिलांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.
या निर्णयासाठी रजीला कुंभरे, पुष्पा नरेटी, अनिता कुमारी सोरी, नरेटी पोलिस पाटील, इंदल कुंभरे सरपंच, श्रावण नरेटी, हिरा उसेंडी, सुकलसिंग कोरचा, शिवचरण जुळा, सरोज धकोडी, फिरमतबाई नरेटी, कुमारी दुर्योधन मडावी, माणकोबाई नरोटी, मनीराम नरोटे, सोनबत्ती नरोटे, ईलाबाई नरोटे, सुनयाबाई नरोटे, राधेराम फुलारे व मुक्तिपथचे युवनाथ मेश्राम यांनी विशेष प्रयत्न केले.



