गडचिरोलीविदर्भ

अवकाळी पावसाचा कहर ; दोन ठिकाणी वीज कोसळून ११ जनावरे ठार

पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान

गडचिरोली : जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. धानोरा तालुक्यात वीज कोसळल्याने एकाच वेळी १० जनावरे ठार झाली, तर कोरची तालुक्यातही वीज पडून एका जनावराचा मृत्यू झाला. या घटनांमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

धानोरा तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. तालुक्यातील खरगी गाव जे की पयडी परिसरात येते, येथे ही दुर्दैवी घटना घडली. गावाजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाखाली काही जनावरे विश्रांती घेत होती. रात्री सुमारे ११ वाजता अचानक या आंब्याच्या झाडावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत एकाच वेळी १० जनावरे जागीच ठार झाली.

दुसरी घटना कोरची तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या कामेली गावात घडली. येथे १६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळली. यात आसाराम रूपजाळे यांचा एक बैल जागीच ठार झाला. या घटनेमुळे रूपजाळे यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास धानोरा तालुक्यातील काही भागांत अवकाळी पाऊस झाला. धानोरा-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील पांढरसडा ते गिरोला मार्गावर एक मोठे झाड कोसळल्याने वाहतुकीत काही काळ व्यत्यय आला होता. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button