गडचिरोलीविदर्भ

आशासेविका भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ; भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

देसाईगंज: देसाईगंज तालुक्यातील कुरुड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत झालेल्या आशा स्वयंसेविकांच्या पदभरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. निवड समितीने नियमांचे उल्लंघन करून पात्र आणि उच्चशिक्षित असलेल्या विधवा महिलेला डावलल्याचा दावा करत, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आणि ग्रामस्थांनी ही भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा पारदर्शकपणे राबवण्याची मागणी केली आहे.

कुरुड येथील रहिवासी असलेल्या कल्याणी महेश वासनिक या उच्चशिक्षित विधवा महिलेसह एकूण ६३ महिलांनी आशा वर्करच्या दोन पदांसाठी अर्ज केला होता. कल्याणी वासनिक यांनी आरोप केला आहे की, निवड समितीचे सचिव डॉ. पत्रुजी सडमाके यांनी त्यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना मौखिक परीक्षेत कमी गुण देऊन अपात्र ठरवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. हा एका पात्र आणि गरजू महिलेवर झालेला अन्याय असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रकरणात पारदर्शकता आणण्यासाठी भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेकॉर्डिंगसह निवड प्रक्रिया राबवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गडचिरोलीचे पालकमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती दुडुलकर यांना सादर करण्यात आले आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भीमराव शेंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा निमगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कुरुड येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेमुळे आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button