गोंदियाविदर्भ

आश्रमशाळांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू ; विभागीय नोडल अधिकारी डॉ. निमगडे यांनी केली पाहणी

विद्यार्थ्यांना दिले स्वच्छतेचे धडे

गोंदिया : राज्यातील काही आश्रमशाळांमध्ये गोवरचे रुग्ण आढळल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये गोवर आणि रुबेला विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत, गोंदिया जिल्ह्यातील ४९ आश्रमशाळांमधील ५ ते १५ वयोगटातील सर्व मुलांना गोवर-रुबेला लसीची अतिरिक्त मात्रा दिली जात आहे.

नागपूर विभागाचे नोडल अधिकारी डॉ. शाम निमगडे यांनी १७ सप्टेंबर रोजी गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सुगत आश्रमशाळेला भेट देऊन लसीकरण सत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. हात धुण्याचे महत्त्व: डॉ. निमगडे यांनी मुलांना सोप्या भाषेत हात धुण्याच्या पद्धती सांगितल्या. त्यांनी संसर्ग टाळण्यासाठी २० सेकंद साबणाने हात धुणे किती महत्त्वाचे आहे, हे समजावून सांगितले. वैयक्तिक स्वच्छता: त्यांनी दात घासणे आणि आंघोळ करणे यांसारख्या मूलभूत स्वच्छतेच्या सवयींबद्दल मार्गदर्शन केले. पाणी आणि परिसर: दूषित पाणी, अस्वच्छता आणि उघड्यावर शौचास बसल्याने होणाऱ्या रोगांबद्दल त्यांनी मुलांना जागरूक केले आणि स्वच्छ पाणी पिण्याचा तसेच शौचालयाचा नियमित वापर करण्याचा सल्ला दिला.

यावेळी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कापसे, गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, सोनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीप बघेले, तालुका आरोग्य सहाय्यक रवी पटले, आरोग्य पर्यवेक्षक राठोड, ब्लॉक मॅनेजर रहांगडाले उपस्थित होते. डॉ. निमगडे यांच्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत एक चांगला संदेश मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button