
स्थानिक नागरिकांचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना निवेदन
गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसमसूर परिसरातील नागरिकांनी मंजूर झालेल्या ३३ केव्ही सब-स्टेशनचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून या सब-स्टेशनला मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने नागरिकांनी माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कसमसूर परिसरातील ७० गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यासोबतच, कमी दाबाच्या वीजेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, घरगुती कामे आणि लघुउद्योगांवरही याचा मोठा परिणाम होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांची समस्या ऐकून घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी त्यांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी संबंधित वीज वितरण विभागाशी संपर्क साधून लवकरच काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच, गडचिरोलीचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
निवेदन देताना कसमसूर ग्रामपंचायत सरपंच कमल हेडो, जवेली बुर्ज सरपंच अलिशा गोटा, वाघेझरी सरपंच विलास कोंदामे, जवेली खुर्द सरपंच मुन्ना पुंगाटी, महादेव पदा, सादु कोरामी, सिंदू मोहोंदा, देविदास मटामी, प्रकाश पुंगाटी, राजू गोमाडी, विकास झोरे, पुसू गावडे, मैनू लेकामी, बेबी हेडो, बेबी कन्नलवार, दमाजी नारोटे, बाबुराव पुंगाटी, देऊ गावडे, गंगाराम इष्टाम, सुधाकर गोटा, लालसू नरोटे आणि इतर अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.



