क्राईमगोंदियाविदर्भ

जुन्या वादातून वृद्धाची निर्घृण हत्या ; चौघांना अटक

गोंदिया : जुन्या वादाच्या रागातून घरात शिरून वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम डब्बेटोला येथे रविवारी (दि.१४) सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्नीलाल वारलू कटरे (६०, रा. डब्बेटोला) असे मृताचे नाव आहे.

मृत मुन्नीलाल गावातच चहापान व बिस्कीटचे दुकान चालवत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या मनीषा रवी मेश्राम हिला मूलबाळ नसल्याच्या कारणावरून यापूर्वी काही वेळा वाद झाल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये बोलणे बंद होते. रविवारी (दि. १४) सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास मुन्नीलाल कटरे आणि मनीषा मेश्राम यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद झाला. त्यानंतर मुन्नीलाल आपली बहीण श्यामकला कटरे यांच्या घरी गेला. काही वेळातच रवि लक्ष्मण मेश्राम (३१), संजय लालाजी मेश्राम (३८), मनीषा रवी मेश्राम (२८) आणि अक्षय हेतराम मेश्राम (२५) हे चौघेही कटरे यांच्या घरी पोहोचले. चौघांनी शिवीगाळ करीत मुन्नीलाल याला घराबाहेर येण्यास सांगितले. मात्र, तो बाहेर न आल्याने आरोपी घरात शिरले व त्याला जबरदस्तीने ओढत बाहेर आणले. यावेळी मध्ये पडलेल्या श्यामकला कटरे आणि त्यांच्या वृद्ध आईलाही धक्काबुक्की व मारहाण केली. त्यानंतर घरासमोरील सिमेंट रस्त्यावर नेऊन मुन्नीलाल याला थापडबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण करण्यात आली.

आरोपींनी अंगणातील बैलगाडीच्या लाकडी फळ्याने त्याच्या छाती, पोट, कंबर आणि पायावर वारंवार प्रहार केला. मारहाणीनंतर आरोपी घटना स्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत मुन्नीलाल याला घरी आणण्यात आले. गावातील डॉ. गोविंद रहांगडाले यांना बोलावण्यात आले. सकाळी १० वाजता त्यांनी तपासणी करून मुन्नीलाल यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणातील आरोपी रवी लक्ष्मण मेश्राम (३१), संजय लालाजी मेश्राम (३८) आणि अक्षय हेतराम मेश्राम (२५, रा. डब्बेटोला) यांना लगेच सायंकाळी अटक करण्यात आली. आता त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button