
गोंडवाना विद्यापीठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात ; दोन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांना ‘जीवन साधना गौरव पुरस्कार‘
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची वाटचाल ‘ज्ञानातून विकास’ या दिशेने सुरू असून, विद्यापीठात राबवले जाणारे उपक्रम इतर कोणत्याही विद्यापीठात नाहीत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात होत असलेल्या विकासाचे मॉडेल जगाने स्वीकारले पाहिजे, असे आवाहन नागपूरचे प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाचा १४ वा वर्धापन दिन सोहळा विजयादशमीच्या (दसरा) पार्श्वभूमीवर सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाच्या नवीन सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, स्व. मारोतराव कांबळे यांचे पुत्र प्राचार्य देवेश कांबळे, डॉ. नंदकिशोर खत्री, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अधिष्ठाता आंतर विद्याशाखा प्रो. प्रगती नरखेडकर, वित्त व लेखा अधिकारी सी. ए. भास्कर पठारे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत मोहिते यांची उपस्थिती होती.
डॉ. मेश्राम म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठातून येथील विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येथे विविध अध्यासनांची निर्मिती ही अभिमानास्पद बाब असून, यातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विचारधारा रुजेल. त्यांनी डॉ. बाबा आमटे यांचे अध्यासन सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्रातील रंजक उदाहरणे देऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात होणारे बदल समजावून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या प्रास्ताविकाने व विद्यापीठाच्या उपक्रमांच्या माहितीने झाली.
या कार्यक्रमात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते व शिक्षणतज्ज्ञ स्वर्गीय मारोतराव कांबळे यांना मरणोत्तर “जीवन साधना गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. त्यांचे पुत्र प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नंदकिशोर खत्री यांनाही विद्यापीठाचा “जीवन गौरव साधना पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. देवेश कांबळे यांनी पुरस्काराची रक्कम विद्यापीठातील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अध्यासन केंद्राच्या कार्यासाठी दान केली, तर डॉ. नंदकिशोर खत्री यांनी आपली पारितोषिक रक्कम कृषी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी दान केली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. विद्यापीठाच्या अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचे शिक्षण मिळत असून, अनेक विद्यार्थ्यांना विविध संस्थांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. “विद्यापीठ रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करेल, तेव्हा आणखी मोठी प्रगती साध्य करावी लागेल,” असे त्यांनी नमूद केले. आमदार तथा अधिसभा सदस्य डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी नेहमी मदतीस तत्पर राहण्याची ग्वाही दिली.
सूत्रसंचालन डॉ. शिल्पा अठावले यांनी केले तर कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी आभार मानले. यावेळी अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण
यावेळी विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट अधिसभा सदस्य गुरुदास कामडी, उत्कृष्ट महाविद्यालय आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय, देसाईगंज (वडसा), उत्कृष्ट प्राचार्य डॉ. मृणाल काळे (आनंद निकेतन, वरोरा), उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक प्रा. डॉ. अभय सोळूके (श्री. गो. मुनघाटे, कुरखेडा), उत्कृष्ट रासेयो महाविद्यालय एकक सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर (विद्यापीठस्तरीय), उत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदिप गौडं (सरदार पटेल, चंद्रपूर – विद्यापीठस्तरीय), उत्कृष्ट विद्यार्थीनी कु. आर्थिका संजय उपाध्ये (जनता महाविद्यालय, चंद्रपूर – विद्यापीठस्तरीय), क्रीडा विभागाकडून प्राविण्य प्राप्त महाविद्यालय (प्रथम) आनंदनिकेतन महाविद्यालय, वरोरा, उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गजानन बोरकर (महात्मा गांधी, आरमोरी).



