‘आदिसेवा पर्वा’मुळे आदिवासी समाजाच्या विकासाला गती ; ६,८५९ गावांमध्ये ‘आदिसेवा केंद्रे’ कार्यान्वित

मुंबई : केंद्र सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी सुरू केलेल्या ‘आदिसेवा पर्वा’मुळे राज्यातील आदिवासी भागातील विकासाला मोठी गती मिळाली आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राज्यभर राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत आदि-कर्मयोगी अभियानात समाविष्ट असलेल्या ६,८५९ गावांमध्ये ‘आदिसेवा’ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आदिवासी बांधवांच्या समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करणे हे या केंद्रांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हे अभियान धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी संलग्न असून, ‘आदिसेवा पर्वा’दरम्यान गाव पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये शिवारफेरी, महिला सभा, वार्ड सभा आणि घरोघरी भेटी यांचा समावेश होता.
या उपक्रमांमधून गावकऱ्यांच्या गरजा जाणून घेण्यात आल्या आणि त्यानुसार गाव विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यांना २ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यानुसार पुढील पाच वर्षांत आदिवासी समाजाला आवश्यक सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
आदि-कर्मयोगी अभियानांतर्गत प्रतिसादात्मक प्रशासन निर्माण करण्यासाठी राज्यात सुमारे १ लाख आदि कर्मयोगींची फौज उभारली जात आहे. यामुळे प्रशासन आणि आदिवासी बांधवांमध्ये थेट संवाद साधण्याची प्रभावी व्यवस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक ‘आदिसेवा’ केंद्रात दर आठवड्याला ग्रामविकास, महसूल, कृषी, आदिवासी विकास विभाग यांसारख्या शासकीय यंत्रणांमधील अधिकारी उपस्थित राहून आदिवासी बांधवांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करणार आहेत.
या अभियानात महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमधील १९९ तालुक्यांतील ६,८५९ गावांचा समावेश आहे. ‘आदिसेवा’ पर्वाने आदिवासी विकासाला एक नवी दिशा दिली असून, प्रशासन लोकाभिमुख होण्यास मदत मिळणार आहे.
आदि-कर्मयोगी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या आदिसेवा पर्वामुळे आदिवासी समाजाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल. लोकसहभाग आणि प्रशासनाचा सक्रिय पाठपुरावा यांच्या माध्यमातून गाव विकास आराखडा प्रभावीपणे राबविला जाईल. यामुळे पुढील पाच वर्षांत आदिवासी समाजाला आवश्यक सर्व मूलभूत सेवा उपलब्ध होऊन सर्वांगीण विकास साधता येईल.
– डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास मंत्री
आदि-कर्मयोगी अभियान हे आदिवासी विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. आदिसेवा पर्वाच्या माध्यमातून सुरू झालेली ही प्रक्रिया आदिवासी समाजाला सशक्त करण्याच्या दिशेने एक पाउल आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.
– विजय वाघमारे, सचिव, आदिवासी विकास विभाग



