भंडाराविदर्भ

धरणातून अचानक पाणी सोडल्याने वैनगंगेत ट्रॅक्टर वाहून गेला ; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे वाचले चालकाचे प्राण

भंडारा : मोहाडी तालुक्यातील देव्हाडा आणि तुमसर तालुक्यातील माडगी गावांदरम्यान वैनगंगा नदीपात्रात शुक्रवारी दुपारी एक अत्यंत थरारक घटना घडली. कवलेवाडा धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे नदीचा जलप्रवाह वेगाने वाढला आणि रेल्वेच्या पुलाच्या कामावरील यंत्रसामग्री काढण्यासाठी गेलेला ट्रॅक्टर पाण्यात अडकून वाहून गेला. सुदैवाने, नदीकाठच्या ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चालकाला दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे.

देव्हाडा-माडगी परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर मुंबई-हावडा रेल्वे मार्गाचा पूल आहे. या पुलाच्या कामासाठी नदीपात्रात काही यंत्रसामग्री व जनरेटर ठेवण्यात आले होते. नदीची पाणीपातळी वाढणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर, माडगी येथील अमृत बुधे यांचा ट्रॅक्टर जनरेटर बाहेर काढण्यासाठी भाड्याने घेण्यात आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास जनरेटर बाहेर काढण्याचे काम सुरू झाले; मात्र त्याच वेळी कवलेवाडा धरणातून अचानक पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगेचा प्रवाह काही मिनिटांतच रौद्ररूप धारण करू लागला.

पाण्याचा वेढा ट्रॅक्टरभोवती पडत असल्याचे पाहून चालकाने वाहन बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ट्रॅक्टर काही अंतरापर्यंत पुढे सरकला देखील, मात्र पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि ट्रॅक्टर व जनरेटर नदीच्या मध्यभागी पाण्यात पूर्णपणे अडकले. बघता बघता संपूर्ण ट्रॅक्टर पाण्यात बुडू लागला.

ट्रॅक्टर पाण्यात अडकल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी नदीकाठी एकच गर्दी केली. वाढत्या प्रवाहात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तात्काळ दोऱ्यांची व्यवस्था केली. स्वतःच्या जिवाची बाजी लावत ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने चालकाला पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप ओढून काढले. मात्र, ट्रॅक्टर आणि जनरेटर नदीच्या पात्रातच जलसमाधी घेऊन वाहून गेले. हा संपूर्ण थरार काठावरील नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून, ट्रॅक्टर वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पावसाळ्याचे दिवस असताना आणि धरणातून पाणी सोडण्याची शक्यता असतानाही नदीपात्रात अशा प्रकारे काम सुरू ठेवणे किती योग्य होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पाणी सोडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला किंवा कंत्राटदाराला पूर्वकल्पना देण्यात आली होती का? आणि रेल्वे प्रकल्पाच्या कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचे काटेकोर पालन झाले होते का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button