
आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश
अहेरी : मूलचेरा तालुक्यातील मौजा कासमपल्ली, गुर्जा बुज., वेडमपल्ली आणि एटापल्ली तालुक्यातील कोंदावाही, बिड्री, येमली या मार्गांवर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी महामंडळाची बस सेवा सुरू झाली आहे. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
या बससेवेचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते नारळ फोडून आणि हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी हर्षवर्धनबाबा आणि डॉ. मिताली आत्राम यांनी स्वतः बसमध्ये बसून काही अंतर प्रवास करत नागरिकांच्या आनंदात सहभाग घेतला.
यापूर्वी सदर गावांकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता, त्यामुळे कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नव्हती. सन २०१९ मध्ये डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेचे प्रतिनिधीत्व सुरू केल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन केले. सन २०२० ते २०२१ या वर्षात हा रस्ता मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर तीन वर्षांत त्याचे बांधकाम पूर्ण झाले.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आमदार आत्राम यांनी अहेरीपासून कासमपल्ली, गुर्जा बुज., वेडमपल्ली, कोंदावाही, बिड्री, येमली या मार्गाने एसटी महामंडळाची बस सेवा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर ही बस सेवा सुरू झाली आहे, ज्यामुळे या मार्गावरील १० ते १२ गावातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे.
या बसच्या शुभारंभप्रसंगी डॉ. मिताली आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कासमपल्लीचे पाटील जोगा मडावी, मेडपल्ली ग्रामपंचायतीचे सदस्य यशवंत कोडापे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबुराव तलांडी, सुरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडी, सुनील नैताम, तुकाराम ईश्टम, बिच्चू गावडे, रैनु गावडे, विलास वेलादी यांच्यासह मौजा कासमपल्ली गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बससेवेमुळे या दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यास मदत होणार आहे.



