कृषीगडचिरोलीविदर्भ

शेतकरी सन्मानार्थ ‘विकसित भारत जी राम जी’ योजना ठरणार लाभदायी – उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे

किसान दिनानिमित्त सोनापूर कृषी विज्ञान केंद्रात भव्य शेतकरी मेळावा ; आदर्श शेतकऱ्यांचा गौरव

गडचिरोली : शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र शासनाने जुन्या मनरेगा योजनेत आमूलाग्र सुधारणा करून ‘विकसित भारत जी राम जी’ ही नवी लोककल्याणकारी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२५ दिवस रोजगाराची हमी मिळणार असून, ही योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ठरेल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती स्मिता बेलपत्रे यांनी केले.

‘भारतीय किसान दिना’चे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या सोनापूर-गडचिरोली कृषी विज्ञान केंद्रात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात त्या बोलत होत्या.

बेलपत्रे यांनी पुढे सांगितले की, “शेतकऱ्यांनी आपल्या वैयक्तिक आणि गावाच्या विकासासाठी कामांचा आराखडा तयार करावा. आगामी ग्रामसभांमध्ये याचे ठराव पारित करून कामांची यादी सादर करावी, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घेता येईल.”

कार्यक्रमात उपस्थित तज्ञांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. केव्हीके प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने धान लागवड आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले. तसेच कृत्रिम रेतनाद्वारे देशी गायींची वंशावळ सुधारून दूध उत्पादन वाढवण्याचे आवाहन केले. ‘स्पर्श’चे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे यांनी कुपोषणावर मात करण्यासाठी ‘परसबाग’ मॉडेल सुचवले. सेंद्रिय शेतीसाठी गांडूळखत आणि शेणखत निर्मितीवर भर देण्याचे सांगितले. जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. मनोज दोनाडकर यांनी दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत सकस पशुखाद्य, चारा प्रक्रिया आणि दूध संकलन योजनांची सविस्तर माहिती दिली.

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हिरापूर येथील सुरेश देशमुख, पत्रुजी निसार, तुलाराम बाबनवाडे, लिलाधर गुरनुले, प्रफुल देशमुख (डुकरझरा), गिरीधर कुमरे (रांगी), महानंदा पेंदाम (खुटगाव) आणि चेतना मडावी (सिताटोला) या शेतकऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या मेळाव्याला कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ निलिमा पाटील, सुचित लाकडे, डॉ. विक्रम कदम, नरेश बुद्धेवार, तसेच ‘स्पर्श’ आणि ‘कोईत्तुर शेतकरी उत्पादक कंपनी’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित लाकडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार निलिमा पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button