क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; चार चिमुकल्यांचे छत्र हरपले

रुपीनगट्टा येथील धक्कादायक घटना

धानोरा : चारित्र्यावरील संशयाने सुखी संसाराचा खेळखंडोबा केल्याची धक्कादायक घटना धानोरा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील रुपीनगट्टा येथे घडली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून स्वतःही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या भीषण घटनेमुळे चार निष्पाप मुले आणि वृद्ध वडिलांचे छत्र हरपले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश सुकना कुजूर (३७) आणि त्याची पत्नी कनिष्ठा (३२) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चारित्र्याच्या संशयावरून वाद सुरू होते. घटनेच्या दिवशी, पेंढरी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या रुपीनगट्टा येथील शेतात धानाची मळणी आटोपल्यानंतर हे दाम्पत्य शेतावर गेले होते. सोबत राकेशचे वडील आणि मुलगी देखील होते. दुपारी पती-पत्नीने घराकडे जात असल्याचे सांगितले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत.

सायंकाळी वडील आणि मुलगी घरी परतल्यानंतर राकेश आणि कनिष्ठा दोघेही बेपत्ता असल्याचे लक्षात आले. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली असता, दुसऱ्या दिवशी दुपारी गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. राकेशने कनिष्ठाचे डोके दगडावर आपटून तिची हत्या केल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरून स्पष्ट झाले.

पत्नीची हत्या केल्यानंतर राकेश पसार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, शोध सुरू असतानाच राकेशचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळून आला. पत्नीची हत्या केल्यानंतर पश्चात्तापाने किंवा पोलीस कारवाईच्या भीतीने त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

चार चिमुकली मुले पोरकी

या दुर्दैवी घटनेमुळे कुजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत दाम्पत्याला मानवी (१२ वर्षे), मेहमा, शालिनी या तीन मुली. आणि अर्णव हा एक लहान मुलगा आहे. आई आणि वडील दोघांचाही मृत्यू झाल्याने ही चारही मुले आणि त्यांचे वृद्ध आजोबा आता पूर्णपणे निराधार झाले आहेत. संशयाच्या भूत पछाडल्याने एका हसत्याखेळत्या कुटुंबाची अशी भीषण राखरांगोळी झाल्याने रुपीनगट्टा गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button