
देसाईगंज : येथील ग्रामीण रुग्णालयात आ. कृष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवा असे निर्देश आ. गजबे यांनी दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी, तालुका महामंत्री वसंता दोनाडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मीसार, सामाजिक कार्यकर्ते रोशन ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आ. गजबे यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासंदर्भात व आवश्यक आरोग्य सेवा संदर्भात माहिती घेऊन १०० खाटांची व्यवस्था करणे, आवश्यक प्रमाणात डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदभरती, रुग्णांची गरज लक्षात घेता रुग्णवाहीका व ब्लड बँकेची मागणी लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. तसेच अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही पाठपुरावा करण्यात आला असून लवकर प्रश्न मार्गी लागणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा देण्यात मौलिक मदत होणार असल्याचे सांगितले.



