क्राईमभंडाराविदर्भ

वृद्धाला मारहाण करणाऱ्या युवकाला २ वर्षांचा सश्रम कारावास

लाखांदूर न्यायालयाचा अवघ्या २ महिन्यांत निकाल ; २ हजारांचा दंडही ठोठावला

लाखांदूर : सार्वजनिक ठिकाणी विनाकारण अश्लील शिवीगाळ करत, लोखंडी सळाखीने एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपी युवकाला लाखांदूरच्या न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने अवघ्या दोन महिन्यांत सुनावणी पूर्ण करत आरोपीला दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नितीन भुते (वय ३५, रा. लाखांदूर प्लॉट) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात लाखांदूर येथील चांदणी चौक परिसरात घडली होती. बालकिशन गोडसेलवार (वय ७५, रा. लाखांदूर) हे स्थानिक पानठेल्यावर काही नागरिकांसोबत चर्चा करत असताना, आरोपी नितीन भुते तेथे आला. त्याने गोडसेलवार यांना विनाकारण शिवीगाळ करत लोखंडी सळाखीने हातावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पीडित गोडसेलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष चव्हाण आणि पोलीस अंमलदार ओमकार सपाटे यांनी तत्काळ तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

न्यायालयात १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत न्या. प्रवीण यादव यांनी जलदगतीने निर्णय देत आरोपी नितीन भुते याचा दोष सिद्ध केला. न्यायालयाने दिलेल्या या जलद निर्णयामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button