गोंदियामुख्य बातमीविदर्भ

बिबट्याने हल्ला करून १५ मीटर नेले फरफटत ; मृत्यूच्या दाढेतून परतली चिमुकली

कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने वाचले प्राण ; गोठणगाव येथील घटना

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील गोठणगाव येथे शुक्रवारी (दि. ३०) रात्री ९ वाजताच्या सुमारास एका चार वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. घरामागील शौचालयातून शौच करून परत येत असताना बिबट्याने चिमुकलीला सुमारे १५ मीटर फरफटत नेले. मात्र, चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तिला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामुळे चिमुकलीचे प्राण वाचले, परंतु तिच्या मानेला दुखापत झाली आहे. युक्ता मारोती निखारे (वय ४, रा. गोठणगाव), असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोठणगाव परिसर हा जंगलव्याप्त असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मारोती निखारे यांची चार वर्षांची मुलगी युक्ता घरामागे असलेल्या शौचालयात शौचासाठी गेली होती. ती शौच करून परत येत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. बिबट्याने तिच्या मानेला पकडून तिला फरफटत नेले. युक्ताचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे कुटुंबीय धावून आले आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजाने शेजारील लोकही धावून आले आणि त्यांनीही जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. लोकांची आरडाओरड ऐकून बिबट्याने युक्ताला सोडून दिले आणि तो जंगलाच्या दिशेने पळ काढला. यामुळे युक्ताचे प्राण वाचले, परंतु बिबट्याने मानेला पकडल्यामुळे तिला दुखापत झाली.

कुटुंबीयांनी तातडीने जखमी युक्ताला गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तसेच, या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यांनी गावकऱ्यांना सजग राहण्याच्या सूचना दिल्या असून, या परिसरात गस्त लावण्यात येणार असल्याचेही सांगितले.

या घटनेमुळे गोठणगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button