
नागरिकांशी साधला थेट संवाद ; मंदिर संवर्धन, भूसंपादन, पूरनियोजन आणि स्थानिक युवकांच्या रोजगारावर विशेष भर
गडचिरोली : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्कंडादेव परिसरातील प्रलंबित विकासकामे वेगाने पूर्ण करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे संबंधित यंत्रणांना दिले. सोमवार, ३० जून रोजी आयोजित विशेष ‘नागरिक संवाद’ कार्यक्रमात त्यांनी भूसंपादन, मंदिर संवर्धन, रस्ते, पूरनियोजन, आरोग्य सुविधा आणि स्थानिक युवकांच्या रोजगारासह विविध विकासकामांचा थेट चर्चेतून आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच तसेच सार्वजनिक बांधकाम, पुरातत्त्व, एमएसआरडीसी आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
रस्ते व भूसंपादन प्रक्रिया गतिमान करा
मार्कंडादेव वळण मार्गासाठी उर्वरित जमिनीचे भूसंपादन नियमानुसार तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. तसेच एमएसआरडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे वाहतुकीत निर्माण होणाऱ्या अडचणींवरून त्यांनी कडक सूचना दिल्या. वाहतूक पूर्णपणे बंद न करता योग्य नियोजनाद्वारे पुढील दोन महिन्यांत ही कामे पूर्ण करावीत, जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.
मंदिर संवर्धनाच्या संथ गतीवर नाराजी
मार्कंडादेव मंदिराच्या संवर्धनाची कामे संथ गतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकारी पंडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामाचा वेग वाढवण्यासाठी तातडीने मनुष्यबळ वाढवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पुरातत्त्व विभागाला दिले.
आपत्कालीन पूरनियोजन व आरोग्य सेवा सज्जता
अतिवृष्टी किंवा धरणातून पाणी सोडल्यामुळे मार्कंडादेवकडे जाणारे मार्ग बंद होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित विभागांनी पर्यायी व्यवस्था, पूरनियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांचा सविस्तर आराखडा तयार करावा. तसेच पूरस्थितीत नागरिकांना आरोग्य सुविधा खंडित होऊ नयेत यासाठी आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ व सेवा सज्ज ठेवण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
स्थानिक तरुणांसाठी स्वतंत्र रोजगार आराखडा
परिसरातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून एक स्वतंत्र रोजगार आराखडा तयार करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. विकासकामांची नियमित समीक्षा केली जाईल. प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून मार्कंडादेव परिसराचा सर्वांगीण, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास साधण्यावर आमचा भर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले.



