
अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा ; जिवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या तंत्रज्ञांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
गडचिरोली : वादळ असो, पाऊस असो वा कडक उन्हाळा, ग्राहकांच्या घरापर्यंत अविरत प्रकाश पोहोचवण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या महावितरणच्या लाईनमन बांधवांचा आज गडचिरोलीत यथोचित गौरव करण्यात आला. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ४ मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय लाईनमन दिवस’ म्हणून महावितरण मंडळ कार्यालय, गडचिरोलीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांनी आपल्या भाषणात लाईनमनच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “लाईनमन हे महावितरणचे खऱ्या अर्थाने ‘प्रकाशदूत’ आहेत. नैसर्गिक आपत्ती असो वा कोरोनासारखा कठीण काळ, या कर्मचाऱ्यांनी कधीही आपली सेवा खंडित होऊ दिली नाही. त्यांच्या या समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आजचा हा दिवस समर्पित आहे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व वीज कर्मचाऱ्यांना विज सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. अमरावती प्रशिक्षण केंद्राचे उपकार्यकारी अभियंता अनिल पाणोडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना विज सुरक्षेचे महत्त्व विषद करून तांत्रिक कामात घ्यावयाची खबरदारी यावर मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेशचंद्र आणि संचालक (मासं) श्री. राजेंद्र पवार यांची शुभेच्छापर व्हिडिओ क्लिप दाखवून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
उपस्थित सर्व वीज कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता हितेश पारेख, संजय सराटे (प्रशासन) अतिरिक्त कार्यकारी अभियंता विवेक गजभिये, प्रभाकर मेश्राम, प्रकाश नारे (व्यवस्थापक), वैशाली रंगारी (प्रभारी व्यवस्थापक), तांत्रिक प्रतिनिधी प्रशांत भराडे, रमेश मेश्राम (मुख्य तंत्रज्ञ), मंगला किरमीरे (प्रधान तंत्रज्ञ) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य लिपिक रंजन बल्लमवार यांनी केले, तर आभार उपव्यवस्थापक आशिष बुरडे यांनी मानले. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक अभियंता लव गौरकार, रोहन ठाकरे, सुमित धकाते, कनिष्ठ अभियंता मंगेश शेडमाके, विशाल केळापुरे आणि मंगेश धनवार यांनी परिश्रम घेतले.



